★ Menu ★

वंशावळीच्या नोंदीतून इतिहासाचे जतन, तुळजापुरातील पुजार्‍यांकडे शेकडो वर्षांचे ‘बाड’ - News

पुजारी आणि भाविक यांच्यातील व्यवहार अव्याहतपणे पिढ्यान्पिढ्या सुरु राहावा या उद्देशाने तुळजापूरच्या पुजार्‍यांनी लिहून ठेवलेले ‘बाड’ अर्थात वंशावळीच्या नोंदीने अनाहूतपणे अनेकांच्या कित्येक पिढ्यांच्या इतिहासाचे जतन केले आहे. म्हणूनच अनेक राजे-महाराजे आणि राजकीय नेते यांच्या वंशावळी तुळजापूरच्या पुजार्‍यांकडे आजही पाहायला मिळतात. पूर्वीच्या वंशावळी या मोडी लिपी आणि उर्दूत भाषेत असायच्या. आता त्या मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिल्या जात आहेत.

तुळजाभवानी देवी मंदिरात भाविकांना आपला परंपरागत पुजारी ओळखता यावा यासाठी भाविकांच्या पूर्ण नोंदी ठेवण्याची पद्धत शेकडो वर्षांपासून पुजार्‍यांनी सुरु ठेवली आहे. या नोंदी ज्या वहीत ठेवल्या जातात, त्या नोंदवहीला बाड किंवा वंशावळ म्हटले जाते. या ऐतिहासिक दस्तऐवजास उच्च न्यायालयाने सुद्धा कायदेशीर दस्तऐवज म्हणून मान्यता दिली आहे. याच्याच आधारावर आजमितीस अनेकजण तुळजाभवानी मंदिरात पुजार्‍याचा अधिकार बजावत आहेत.

श्रींच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा पुजारी ठरलेला असतो. येथील पुजार्‍यांच्या वंशावळीत अनेक राजे-महाराजे आणि राजकीय नेत्यांच्या वंशावळी याठिकाणी उपलब्ध आहेत. बाड अर्थात वंशावळ लिहिण्याचे काम आजही तुळजापुरात सुरु आहे. शेकडो वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या पुजार्‍यांकडेच भाविक मुक्कामाला उतरतात. त्याच ठिकाणी भाविकांची भोजन व्यवस्था पुजार्‍यांकडून केली जाते. देवीचा नैवैद्य तयार करून दिला जातो. विशेष म्हणजे मांसाहारी व शाकाहारी भाविकांसाठी वेगवेगळी व्यवस्था या पुजार्‍यांकडून केली जाते.

पूर्वीच्या वंशावळी या मोडीलिपी आणि उर्दू भाषेत लिहिल्या जात. काळाप्रमाणे त्यात बदल होवून आता मराठी आणि इंग्रजीमधून लिहिल्या जात आहेत. एखाद्या कुटुंबात संपत्तीचा वाद सुरु झाला तर या वंशावळीचा आधार आजही घेतला जातो. उच्च न्यायालयाने देखील या नोंदींना कायदेशीर मान्यता दिली असल्याचे समोर आले आहे.

Source: Loksatta News [URL https://www.loksatta.com/maharashtra-news/tuljabhavani-temple-priest-have-record-of-pedigree-of-political-leaders-and-dynasty-from-centuries-1768534/]


This post was published on 18-11-2018 at tuljabhavani.in and tagged under Tulja News, Media News

All Post Previous Post (भाविकांच्या अनुपस्थितीतच होते तुळजाभवानी मंदिरात नित्यपूजा.!)